आपल्या अस्तित्वाचे स्वरूप: जे. कृष्णमूर्ती


 आपल्या अस्तित्वाचे स्वरूप:जे. कृष्णमूर्ती. 

कृष्णमूर्ती अध्ययन केंद्र सह्याद्री, पुणे, कृष्णमूर्ती फाउंडेशन इंडिया यांच्यातर्फे 2002 मध्ये प्रकाशित फक्त 40 रुपये किंमत असलेली 40 पृष्ठांची ही एक छोटेखानी पुस्तिका. प्रा. कल्याणी किशोर यांनी याचा मराठी अनुवाद केलेला आहे.जे.कृष्णमूर्ती यांनी कित्येक वर्षे अमेरिकेमध्ये अनेक जाहीर प्रवचने दिली पण वॉशिंग्टन डी.सी .मध्ये ते कधीही बोलले नव्हते. 1985 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी वॉशिंग्टन डी.सी .मध्ये दोन जाहीर प्रवचने दिली. अतिशय विद्वान आणि गंभीर प्रवृत्तीच्या अभ्यासू श्रोत्यांसमोर दिलेली ही दोन प्रवचने म्हणजे थोडक्यात त्यांच्या शिकवणीचा सारच होय .ही  प्रवचने दिल्यानंतर अवघ्या दहा महिन्यानंतर कृष्णजींचा मृत्यू झाला. यातील पहिल्या प्रवचनाचे शीर्षक आहे" वर्तमाना मध्ये समग्र काळ आहे". या प्रवचनाच्या अगदी सुरुवातीलाच ते स्पष्ट करतात की या व्याख्यानमालेचे प्रयोजन मनोरंजन नव्हे तसेच कुठल्याही विचारधारेचा प्रसार करणे नव्हे. जन्माच्या क्षणापासून ते मृत्यूपर्यंतच्या आपल्या समग्र अस्तित्वासंबंधी आपण बोलणार आहोत .जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्याला जेवढा काळ भेटलेला आहे त्यामध्ये आपण अनेक आर्थिक,सामाजिक ,धार्मिक , वैयक्तिक संबंधाच्या समस्या, व्यक्तिगत परिपूर्तीच्या समस्या आणि स्वतःची मुळे शोधण्याची समस्या अशा अनेक समस्यांना सामोरे जात असतो. या प्रवासात आपल्याला असंख्य भय, चिंता, सुख संवेदना, अनिश्चितता, सुखाचा पाठपुरावा अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.  या सुंदर पृथ्वीवर सर्वच माणसांना प्रचंड वेदना आणि एकाकी पण भोगावे लागते.याबद्दल आणि आधुनिक जीवनात धर्माचे स्थान काय आहे, मृत्यू म्हणजे काय ?धार्मिक मन व ध्यान म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह आपण या प्रवचनातून करणार आहोत. हे काही व्याख्यान नाही तर मानव जातीने या जगात काय करून ठेवले आहे याची एकत्रितपणे छाननी करण्याचा हा एक प्रयास आहे. हा समाज घडवण्यात तुमचा, माझा ,आपल्या सर्वांचाच वाटा आहे.हजारो वर्षांपासून या पृथ्वीवर राहत असताना मनुष्य जातीने एकाकीपण, निराशा, अनिश्चितता, इत्यादी अनेक कष्ट सोसले आहेत. अनेक युद्धे झाली आहेत. आता या क्षणी सुद्धा जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात अनेक ठिकाणी रक्तरंजित युद्ध होत आहेत. त्याचप्रमाणे माणसांना मानसिक युद्धेही लढावे लढावी लागतात, ज्याची इतरांना कल्पना नसते.सर्वत्र युद्धाची तयारी चालू असल्याचे पाहायला मिळते .असे म्हणतात की इहलोकी शांतता नाही,फक्त परलोकात आहे. या पृथ्वीवर ख्रिश्चन लोकांनी जेवढ्या हत्या केल्या तेवढ्या इतर कोणीही केल्या नाहीत.बौद्ध धर्म देव मानत नाही, तर हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. आणि आपण सर्वजण या देवांवरून आणि धर्मग्रंथांवरून युद्ध करत असतो. हजारो वर्षानंतर सुद्धा माणूस असा तिरस्कार करणारा ,द्वेष करणारा, चिंताग्रस्त, हिंसक का राहिला या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे. आपला सतत संघर्ष का चालू असतो ?माणसा माणसांतील हे द्वंद्व संपुष्टात येऊ शकते का याचा विचार एक मानव म्हणून आपल्यालाच करावयाचा आहे. आपण द्वंद्वात  का जगत आहोत ,आपल्या समस्या काय आहेत याची आपण छाननी केली पाहिजे .गणितासारख्या आणि इतर शास्त्रीय विषयांतून आपल्याला समस्या दिल्या जातात. गणितातील प्रॉब्लेम आपल्याला सोडवण्यासाठी प्रशिक्षित केले जाते,आणि आपल्या मेंदूला अशा तऱ्हेने प्रशिक्षण दिले जाते की जीवन म्हणजे समस्या सोडविणे आहे आणि त्यातून अनेक अनेक समस्या निर्माण होत जातात, आणि कुठल्याही प्रश्नाचे, कुठल्याही समस्येचे उत्तर आपल्याला सोडविता येत नाही .आपणास एक अशा प्रकारचा मुक्त मेंदू निर्माण करायचा आहे ज्यामध्ये समस्या नसतील. म्हणून या गोष्टीचा आपण शोध घेतला पाहिजे .जगभरात कुठेही जा, कुठल्याही धर्माचा ,कुठल्याही देशाचा, कुठल्याही रंगाचा आणि वंशाचा माणूस असला तरी तो एका प्रचंड अंतरिक संघर्षा मधून जात आहे.हा संघर्ष प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येतो. मानसिक पातळीवर आपण वेगळे नाहीत, आपण सर्वजण एकच आहोत हे प्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. आपण सर्व एकच आहोत हे लक्षात आल्यावर आपण कधीही इतरांची हत्या करणार नाही. हत्या तर सोडाच, दुसऱ्याला दुखविण्याचाही विचार आपल्या मनात येणार नाही. आपण वास्तविक जगापासून ,सत्यापासून पलायन करण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते ते करत असतो. स्त्री-पुरुष नात्याचेच घ्या. या नात्यांमध्ये संघर्ष का आहे? या नात्यांमध्ये पुरुष स्वतःच्या महत्वकांक्षा,स्वतःचे यशापयश  यांचा पाठपुरावा करत असतो आणि स्त्री सुद्धा तेच करत असते .लैंगिक संबंधाशिवाय स्त्री आणि पुरुष एकत्र कधीच येत नाहीत. तर इतर वेळी ते स्वतःच्या वैयक्तिक इच्छा ,महत्त्वकांक्षा व लोभाचा पाठपुरावा करत असतात. त्यामुळे त्या दोघांमध्ये कोणताही संबंध कसा असू शकेल ?या नात्यांमध्ये विभाजन आहे,प्रेम नाही. त्या नात्यातील स्वार्थांमुळे त्या नात्यांमध्ये संघर्ष आहे. जेथे विभाजन आहे तिथे संघर्ष अटळ आहे ,हा एक नियमच आहे .आपण इतरांवर एवढे अवलंबून असतो की त्याच आपल्या भयातूनच आपण स्वतः गुरु आणि पुरोहित यांची निर्मिती करतो .भयापासून मुक्त होणे शक्य आहे का हा प्रश्नही विचारणे खूप आवश्यक आहे. जिथे क्रूरता आणि हिंसा भरून राहिलेली आहे अशा समाजात भयापासून मुक्त होणे शक्य आहे का ?सौंदर्य कशात असते? सौंदर्य म्हणजे काय ?याचे उत्तर देताना कृष्णजी म्हणतात की जिथे स्व नाही तिथे सौंदर्य आहे. माणसाला भय कशाचे वाटत असते? मृत्यूचेभय ,देवांचे भय, सैतानाचे भय, तुमच्या पत्नीचे भय ,पतीचे भय, राजकारणी लोकांचे भय ,असे अनेक प्रकारचे भय माणसाला भेडसावत असते. भयाचा आणि हिंसेचा संबंध आहे.भयातूनच आपण देवी देवतांची आणि मुक्तिदात्यांची निर्मिती केली आहे. काळ हा भयाचा एक घटक आहे. आज मला नोकरी आहे पण ती उद्या गेली तर ?अशी भीती सुद्धा आपल्याला वाटत असते.काळ हा भूत आहे तसेच तो वर्तमान काळही आहे. अनेक धार्मिक संस्कारांनी आपण बद्ध झालेलो आहोत .आपल्या अंतरंगामध्ये अमुलाग्र उत्पपरिवर्तन म्हणजेचं mutation घडवून आणल्याशिवाय आपण आपला मानसिक ढाचा बदलू शकणार नाही, आणि जगातील हिंसा कमी करू शकणार नाही .हजारो वर्ष विविध धर्मांचे पालन करून सुद्धा आपण हिंसकच राहिलो आहोत आणि उत्तरोत्तर आपली हिंसा वाढतच चाललेली आहे . तिचा पूर्णपणे अंत करण्यासाठी काय केले पाहिजे याचा शोध आपण घेतला पाहिजे. विचार प्रक्रिया विचारांचे मूळ अनुभव अनुभव घेणारा, अशा अनेक विषयांवर कृष्णजी पहिल्या प्रवचनामध्ये बोलतात आणि श्रोत्यांसोबत स्वतः सुद्धा या प्रश्नांची उत्तरे उलगडत जातात .हे प्रवचन वाचणे एक सुंदर असा अनुभव आहे. 

मृत्यू बरोबर जगणे: दुसऱ्या प्रवचनाचे नाव आहे "मृत्यू बरोबर जगणे"या प्रवचनाच्या सुरुवातीला कृष्णजी सांगतात की कालच्या प्रवचनामध्ये आपण भय आणि भयाचा अंत यासंबंधी बोलत होतो.हे जग ज्या खाई मध्ये मध्ये लोटले गेले आहे त्याला आपण सर्वच जण सामूहिकरीत्या जबाबदार आहोत. आपणच एकमेकांची हत्या आणि एकमेकांचा सर्वनाश करीत आहोत. विचार हेच भयाचे मूळ आहे .आत्ताच्या क्षणात, वर्तमान काळात संपूर्ण काळ सामावलेला आहे. एवरेस्ट सारख्या उत्तुंग शिखरावर चढत असताना अनेक गोष्टी मागे सोडून द्याव्या लागतात. सगळी ओझी घेऊन तेवढा मोठा पर्वत चढणे शक्य होत नाही. म्हणून आजवरचे अनेक  धार्मिक संस्कार आणि इतर संस्कार आपल्याला मागे सोडून दिले पाहिजेत .सुख म्हणजे काय याचीही छाननी आपण या ठिकाणी केली पाहिजे .स्वतःकडे सरळ सरळ पाहण्याची आपल्याला भीती वाटत असते.आपण तंतोतंत जसे आहोत तसे स्वतःकडे पाहण्याची प्रत्येकाला भीती वाटत असते. नातेसंबंध हा एक प्रकारचा आरसा आहे. आपण ज्या स्त्रीबरोबर, पुरुषाबरोबर राहतो, तो एक प्रकारे आपला आरसा आहे. त्या आरशात तुम्ही कसे रागावता, तुमची स्वामीत्व गाजवण्याची वृत्ती कशी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. शांततेच्या नावावर, विचारधारांच्या नावावर, ईश्वराच्या नावावर मनुष्याने सतत सुखाचा पि च्छा पुरवला आहे. सत्तेचे पण एक सुख असते. सुख ही भितीच्या नाण्याची दुसरी बाजू आहे. सुव्यवस्था म्हणजे काय आणि अ व्यवस्था म्हणजे काय यावर बोलताना कृष्णजी म्हणतात की जग अ व्यवस्थेत  आहे .जगात भयंकर घटना घडत आहेत .युद्धकलेच्या क्षेत्रात, वैज्ञानिक क्षेत्रात अनेक घडामोडी घडत आहेत. अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत दरिद्री लोक ,युद्धाची सतत टांगती तलवार ,राजकीय पक्षांची भांडणे, अशी प्रचंड अ व्यवस्था जगात आहे .तिच्या स्वरूपाचे आकलन करून तिचा अंत करणे आवश्यक आहे. त्याशिवाय व्यवस्था निर्माण होऊ शकणार नाही. आपल्या दैनंदिन जीवनात व्यवस्था येऊ शकते का हे आपल्याला पाहावे लागेल.दुःख म्हणजे नेमके काय आहे? आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणे म्हणजे दुःख आहे का? दारिद्र्य ,गरिबी म्हणजे दुःख आहे का? आपल्या आजूबाजूला हजारो गरीब लोक आपल्याला पाहायला मिळतात, हे सर्व दुःखी आहेत .आणि तेच नव्हे तर पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या दुःखाने, वेदनेने,पीडित आहे. असंख्य लोक स्वतःच्या वेदना व्यक्त न करता आतल्या आत दुःख सहन करीत जगत असतात. या दुःखाचा अंत करता येईल का हे आपले प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. आणि हा दुःखाचा अंत हा वैयक्तिक नसेल तर संपूर्ण मानव जातीच्या दुःखाचा अंत असेल कारण आपण सर्व एकाच मानवी चेतनने जोडलेले आहोत त्या दिव्य चेतनेचेच स्वरूप आहोत. मृत्यूनंतर काय होते ?आपल्या जीवनातील स्मृती आपण सोबत घेऊन जात असतो का? या जन्मीच्या चांगल्या वाईट कृत्यांचा पुढच्या जन्मी फायदा किंवा नुकसान होऊ शकते का?मरणे म्हणजे काय? याचीही आपण छाननी करू या का? मी आता  जगतो आहे, रोजचा दिवस कसा तरी व्यतीत करतो आहे, यांत्रिक, क्लेशदायक, सुखी,दुखी, आपण कसे जगतो हे सारे तुम्हाला माहित आहे .आणि मृत्यू येतो. अपघाती ,आजारातून वृद्धत्वातून, कसातरी तो येतो.आपण जिवंत असतानाच मृत्यू म्हणजे काय, मरण्याचा अर्थ काय,  याचा आपण शोध घेतला पाहिजे.मृत्यू म्हणजे सर्व गोष्टींचा अंत.माझ्या संबंधांचा, मिळवले आहे त्याचा अंत, सर्व ज्ञानाचा अंत, सर्व अनुभवांचा अंत. पण हा शेवट असूच शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. जन्माप्रमाणेच मृत्यू ही एक अद्भुत गोष्ट आहे, असली पाहिजे .आपण धर्मग्रंथांसारख्या पुस्तकांवर विश्वास ठेवूनच जगत असतो आणि एकमेकांच्या धर्माच्या विरुद्ध लढत असतो. कुरूप जगात जगत असताना सुद्धा वेदना, दुःख, चिंता ,एकाकीपणा यापासून मुक्त होणे शक्य आहे का याचा शोध घेत असतानाच ध्यान म्हणजे काय? याचाही आपण शोध घेतला पाहिजे. या क्षणात आपण जे ऐकत आहोत या क्षणात आपण जे जगत आहोत त्याकडे समग्र अवधान देणे याला मी ध्यान म्हणतो .माणूस ज्ञानाच्या ओझ्याखाली आज दबून गेला आहे त्याने कुठलाही अवकाश शिल्लक ठेवलेला नाही सत्य हे कुठल्याही मंदिरात मशिदीत किंवा चर्चमध्ये मिळत नाही .आणि सत्यापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. पण स्वतःला जाणून घेताना ,स्वतःची छाननी करताना अभ्यास करताना सत्य प्रकट होते. जीवन जगण्याची कला हीच सर्वश्रेष्ठ कला आहे असेही कृष्णमूर्ती सांगतात ही दोन प्रवचने जिज्ञासू वाचकांनी अवश्य वाचली पाहिजेत असे मला वाटते. 

           प्रा. महेंद्र देशमुख. ९०९६६९४२००

Comments

Popular posts from this blog

द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड: ऑग मेंडीनो

पुस्तके... वाचलेली.. वाचावी अशी..

सिद्धार्थ:हर्मन हेसे.