द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड: ऑग मेंडीनो
द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड: ऑग मैन्डिंनो.
द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड हे ऑग मेंडीनो या जगप्रसिद्ध लेखकाचे गाजलेले पुस्तक. या पुस्तकाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन कोटींच्या वर पुस्तक विक्री झाली आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा.पुष्पा ठक्कर यांनी केला आहे . साकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. फक्त 112 पृष्ठ संख्या असणारे हे पुस्तक. शीर्षकावरून एखादे विक्री कलेच्या संदर्भातील पुस्तक वाटत असले तरी हे पुस्तक जीवन जगण्याचे आणि ते अत्यंत समृद्धपणे जगण्याचे अद्भुत तत्त्वज्ञान वाचकांना सांगते. या पुस्तकात सांगितलेल्या दहा सूत्रांचा अवलंब केल्यास तुम्ही सुद्धा या पुस्तकाच्या नायका प्रमाणे ईश्वरी संपत्तीचा भागीदार होऊन प्रचंड संपत्तीचे मालक होऊ शकता पण तेवढा विश्वास आणि तयारी मात्र हवी.या पुस्तका मागील लेखकाची भूमिका अशी आहे की आपण सर्वजण सेल्समन आहोत आणि आपण सर्वच जण कुठल्यातरी गोष्टीची विक्री करत असतो. कुणी बुद्धी विकतो, कुणी श्रम, कोणी कौशल्य ,तर कुणी ज्ञान. यापैकी काहीही विकून अर्थार्जन करत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. या गोष्टी विकत असताना चांगले विक्रेते बनण्यासाठी आवश्यक असणारी दहा सूत्रे या पुस्तकामध्ये दिली आहेत. ज्यांचा वापर करून या कादंबरीचा नायक किशोर वयात असताना या सूत्रांचा वापर करून आपल्या जीवनामध्ये प्रचंड धनसंपत्ती कमावतो आणि शेवटी सर्व संपत्ती वाटून टाकून ही दहा सूत्रे, त्यांचा वसा, योग्य व्यक्तीकडे सोपवितो. अशी थोडक्यात ही कथा आहे .पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये लेखक आपल्या जीवनाविषयी काही गोष्टी सांगतो. तरुण वयामध्ये वायुसेनेमध्ये तो भरती झाला होता.बॉम्ब पथकामध्ये काही काळ काम केल्यानंतर निवृत्त होऊन घरी परतल्यावर दुसरी नोकरी त्याला लवकर मिळाली नाही. छोट्या मोठ्या नोकऱ्या करत शेवटी त्याने विम्याचा व्यवसाय सुरू केला. लग्न केले. एक मुलगी झाली, पण आर्थिक परिस्थिती वरचेवर बिकट होत होती.त्यातच लेखकाला दारूचे व्यसन लागले. आर्थिक ताण तणाव आणि त्याचे व्यसन यांना कंटाळून त्याची पत्नी चिमुकल्या मुलीला घेऊन त्याला सोडून निघून गेली.तो अजून जास्त व्यसनाच्या आहारी गेला .अशा परिस्थितीतून जात असताना शेवटी हे जीवन संपविण्याचा निर्णय लेखकाने घेतला. एका बंदूक विक्रेत्याच्या दुकानात जाऊन 29 डॉलर किमतीचे एक रिवाल्वर त्याने पसंद केले. 30 डॉलर खिशात होते. ती बंदूक विकत घ्यायची, चाप ओढायचा आणि जीवनाचा शेवट करायचा हा त्याचा विचार होता, पण काही कारणामुळे त्याने तो विचार बदलला आणि एका वाचनालयात गेला. तिथे काही सकारात्मक विचारदृष्टी असणाऱ्या लेखकांची पुस्तके वाचली आणि हळूहळू अशी पुस्तके वाचणे त्याने सुरू केले आणि त्याचे व्यसनही हळूहळू कमी झाले. त्यानंतर विमा व्यवसायातील त्या काळाचे दिग्गज असणारे डब्ल्यू .क्लेमेंट स्टोन यांच्या विमा कंपनीमध्ये त्यांनी नोकरी सुरू केली .पण त्याच्या आईने बालपणी त्याला सांगितले होते की तू मोठा झाल्यावर खूप मोठा लेखक होशील. या विचाराचे बीज कुठेतरी लेखकाच्या अंतर्मनात रुजले होते.म्हणून लेखक होण्याच्या दृष्टीने त्याने प्रयास सुरू केले. आपल्या विमा कंपनीचे मुखपत्र, विक्री कलेविषयी एक-दोन पुस्तके, अशी छोटी सुरुवात करून लेखकाने द ग्रेटेस्ट सेल्समन इन द वर्ल्ड हे छोटे छोटे खाणी पुस्तक लिहिले. हळूहळू त्या पुस्तकाची लोकप्रियता वाढू लागली, आणि अल्पावधीतच कोट्यावधी पुस्तके विकली गेली .या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात हाफिद नावाचा एक महान व्यापारी आपल्या सोन्या-चांदीने मढलेल्या महालात ये रझारा घालत असतो. त्या भव्य महालातून तो आपल्या वस्तूच्या गोदामात जातो ,जिथे त्याचा विश्वासू सेवक आणि हिशोब नीस असणारा ईरासमस असतो. हाफिद त्याला विचारतो की आपली एकूण संपत्ती किती असेल तू सांगतो की खजिन्यात 70 लाख सुवर्ण मुद्रा असाव्यात, आणि बाकी वस्तू तीन लाख सुवर्ण मुद्रांपेक्षा जास्त असतील. तो हिशोब निसा ला आदेश देतो की लवकरात लवकर आपल्याकडे असणारा सर्व माल विकून त्याचे पैसे करावेत आणि माझी देश विदेशातील सर्व दुकाने ती सांभाळणाऱ्या व्यवस्थापकांच्या नावे करून देण्यात यावीत आणि त्या प्रत्येकाला 5000 सुवर्ण मुद्रा देण्यात याव्यात. तुला स्वतःला मी 50000 सुवर्ण मुद्रा देतो आणि मी खूप वर्षांपूर्वी कुणाला तरी दिलेले वचन पूर्ण केल्यानंतर हे गोदाम आणि हा भव्य महाल मी तुझ्या नावे करून टाकतो. माझ्या जीवनाचा सूर्य लवकरच अस्त होणार आहे. त्यामुळे माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. मी दिलेल्या सर्व आज्ञा तू पालन केल्यास मी तुला माझे जीवन रहस्य सांगेल जे मी माझ्या पत्नीशिवाय कुणालाही सांगितलेले नाही .काही दिवसानंतर त्याच्या सर्व चल अचल संपत्तीची योग्य विल्हेवाट लावल्यानंतर हाफिद आपल्या विश्वासू सेवकाला घेऊन महालाच्या घुमटा खाली असणाऱ्या जिन्यावरून जाणाऱ्या वाटेवरून एका गुप्त खोलीमध्ये घेऊन जातो. ती गुप्त खोली आजपर्यंत कधीही उघडलेली नसते. त्याच्यामध्ये काय असावे याबद्दल अनेक अफवा पसरलेल्या असतात. त्या खोलीमध्ये असणाऱ्या एका जुन्या सिडारच्या लाकडापासून बनलेल्या सं दुकी मधून हाफिद काही चर्मपत्रे बाहेर काढतो आणि त्या सेवकाला सांगतो की ही खोली जर मौल्यवान हिऱ्यांनी गच्च भरलेली असती तरी त्या हिऱ्यांची किंमत या चर्मपत्रांना एवढी झाली नसती. ही चर्मपत्रे मला एका व्यक्तीने दिली होती आणि त्याने माझ्याकडून वचन घेतले होते की योग्य व्यक्ती भेटल्याशिवाय आयुष्यात कोणालाही या चर्मपत्रांचे रहस्य सांगायचे नाही, किंवा ती कोणाला द्यायची नाहीत. मी अजूनही योग्य व्यक्तीची वाट पाहत आहे. तो त्याला विचारतो की तो योग्य व्यक्ती भेटेपर्यंत तू माझी सोबत करशील का? इथे दुसऱ्या प्रकरणाचा शेवट होतो. तिसऱ्या प्रकरणांमध्ये हाफिदच्या भूतकाळातील गोष्ट लेखकाने सांगितली आहे .तेव्हा हाफिद लहान होता. पत्रोस नावाच्या त्या काळातील सर्वश्रेष्ठ व्यापाऱ्याच्या काफील्यात तो गुरे राखणारा मुलगा म्हणून काम करीत होता. त्याच्या काफील्यातील उंट ,गाढव सांभाळणे ही त्याची जबाबदारी होती.एके दिवशी ऑलिव्ह पर्वताच्या जवळ काफील्याचा मुक्काम पडलेला असताना हाफिद पात्रोसला विनंती करतो की मला गुरे सांभाळण्याचे काम यापुढे करायचे नाही, तर तुमचा माल विकणारा सेल्समन बनावयाचे आहे .मलाही तुमच्याप्रमाणे संपत्ती आणि यश मिळवायचे आहे मला दारिद्र्याची सीमा ओलांडून वारे माप संपत्ती कमाविण्यासाठी सेल्समन बनायचे आहे. मालकाला राग येतो आणि तो म्हणतो की तुझ्या मध्ये ती पात्रता आहे असे तुला वाटते का? आपण म्हणतो की मलाही तुमच्यासारखे प्रचंड धनवान बनायचे आहे ,प्रचंड संपत्ती कमवायची आहे .एवढी संपत्ती मिळवून तू काय करणार आहेस? हे विचारल्यानंतर तो किशोरवयीन मुलगा मालकाला सांगतो की मी तेच करीन जे तुम्ही करीत आला आहात. माझ्या कुटुंबाजवळ जगातील उत्तमातील उत्तम गोष्टी असतील आणि बाकीचे मी गरजवंतांमध्ये वाटून टाकीन. मालक सुरुवातीला त्याच्यावर थोडा रागावतो त्याला या पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो पण त्याची जिद्द आणि चिकाटी पाहून शेवटी तो त्याला विचारतो की हा विचार तुझ्या मनामध्ये कसा निर्माण झाला? आणि हाफिद सांगतो की कालेन नावाच्या व्यापाऱ्याची मुलगी लिसा त्याला आवडली आहे आणि तिच्यासाठी मला प्रचंड संपत्ती मिळवून तिच्याशी लग्न करावयाचे आहे त्याच्या डोळ्यातील जिद्द पाहून अखेर पात्रस त्याची विनंती मान्य करतो आणि त्याला त्याच्या मार्गातील अडथळे, अडचणी याची जाणीव करून देतो आणि त्या अडथळ्यांना न घाबरता कसे मार्गक्रमण करावे याचा उपदेश करतो आणि त्याला एक लाल रंगाचे भरजरी वस्त्र तो देतो जे दुर्मिळ बकरीच्या केसांपासून बनविलेले आहे, ज्याला वनस्पतीच्या दुर्मिळ लाल रंगांपासून रंगवलेले आहे आणि ज्याच्यावर एक चांदणी विणलेली असते जे तोलाचे चिन्ह असते आणि एक चौकोनातील वर्तुळ जे पाथरसचे चिन्ह असते ज्या दोन्ही चिन्हांमुळे त्या वस्त्राची किंमत खूप वाढलेली असते, ते एक मौल्यवान वस्त्र झालेले असते. ती वस्तू देऊन ते वस्त्र देऊन मालक त्याला सांगतो की हे वस्त्र विकण्यासाठी तुला बेथलहेम या ठिकाणी जावे लागेल. तिथे जाऊन या वस्त्राची विक्री करावी लागेल.बेतल हेम मधील लोक खूप गरीब आहेत, त्यांना तुझ्या वस्त्राची किंमत परवडणार नाही. पण तुला हे वस्त्र तिथेच विकावे लागेल. मी सुद्धा यापूर्वी बेताल हेम मध्ये अनेक वस्त्रे विकली आहेत. ही तुझी परीक्षा आहे असे समज .वस्त्र विकून आल्यानंतर मला मोबदला म्हणून एक चांदीचा दिनार तुला द्यावा लागेल. मालक त्याला आशीर्वाद देतो आणि सांगतो की यश मिळविण्याचा तुझा निर्धार पुरेसा ठाम असेल तर तू कधीही हरणार नाहीस. मालकाचा आशीर्वाद घेऊन हाफिद बेतल हेमच्या दिशेने जातो. चार दिवस अथक प्रयत्न करूनही, दारोदार जाऊ नही त्याचे वस्त्र विकले जात नाही. तो प्रचंड निराश होतो आणि तेवढ्यात त्याच्या मनात त्याची प्रेमिका लीसा हिचा विचार येतो, आणि तो म्हणतो की उद्या आपण पुन्हा प्रयत्न करू, हे वस्त्र नक्की विकू, असा विचार करत तो थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जवळ असलेल्या एका गुंफेमध्ये आपले गाढव घेऊन जातो. गुंफेमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशात त्याला एक नवजात बालक दिसते, ज्याचे आई-वडील तिथेच थंडीने कुडकुडत असतात. क्षणात त्या बालकाला बघून मागचा पुढचा विचार न करता ते मौल्यवान वस्त्र त्या बालकाच्या अंगावर हाफिद पां घरतो आणि आपले गाढव घेऊन परत निघून जातो. परत जात असताना तो खूप निराश झालेला असतो की आपण ते वस्त्र विकू शकलो नाही. आता आपल्या मालकाला, पात्रोसला काय उत्तर द्यावे, याचा विचार करत तो परत जातो .पण तो निघाल्यापासून एक तेजस्वी तारा त्याच्या मागोमाग आकाशातून त्याचा पाठलाग करत असतो.मालकाच्या घरी आल्यावर तो तारा आकाशात स्थिर होतो .मालक बाहेरच उभा असतो. तो त्याला विचारतो की तू बेतल हेमवरून सरळ आला आहेस का? तुझ्या पाठोपाठ एक तेजस्वी तारा येत असताना तुला दिसला नाही का? आणि पात्रोस त्याला सांगतो की तो तेजस्वी तारा यापूर्वी मी आकाशात कधीच पाहिला नव्हता .तो सरळ बेथल हे म च्या दिशेने निघून आपल्या काफील्या जवळ आला आणि तू आल्यानंतर तो तारा आता आकाशात स्थिर झाला आहे .तो विचारतो की तिथे काही असामान्य घटना घडली होती का? आणि हाफिद त्याला सांगतो की मी चार-पाच दिवसाच्या अथक प्रयत्नानंतरही ते वस्त्र विकू शकलो नाही .शेवटी मी एका गुंफेमध्ये गेलो जिथे एक नवजात बालक होते. त्याच्या अंगावर मी ते वस्त्र पांघरले. आणि पात्रोच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटते . हाफिद रडायला लागतो, आणि पात्रस त्याला सांगतो की तू हरला नाहीस तर तू जिंकला आहेस, तेव्हा आता जाऊन शांतपणे झोप. त्या दिवशी तो तेजस्वी तारा आभाळात रात्रभर चमकत होता. पलमिरा या ठिकाणी गेल्यानंतर हाफिद पुन्हा पात्रोसला भेटायला जातो. आता पात्रस खूप आजारी झालेला असतो तो त्याला सांगतो की आता आपल्या जीवनातील खूप कमी दिवस उरले आहेत ,आणि तो त्याच्या पलंगाखाली असलेली सिडार लाकडाची संदूक बाहेर काढतो आणि त्याला सांगतो की फार वर्षांपूर्वी मी खूप गरीब असताना एका प्रवाशाचा जीव मी वाचवला होता आणि त्या प्रवाशांनी मला त्याच्यासोबत आपल्या घरी नेले आणि ही संदूक त्याने मला दाखवली आणि त्या संदुकीतील 10 चर्मपत्र मला दाखवून त्याने मला सांगितले की या चर्मपत्रांमध्ये प्रचंड धनसंपत्ती कमावण्यासाठी आवश्यक असलेले दहा नियम लिहिलेले आहेत. ती संदुक मला भेट देऊन मला त्या व्यक्तीने 50 सुवर्ण मोहरा असलेला बटवा भेट दिला आणि सांगितले की मी त्या चर्मपत्रांमधील शिकवण अमलात आणून हवी तेवढी धनसंपत्ती कमवावी आणि योग्य वेळी तुला त्या चर्मपत्रांचा योग्य वारसदार भेटेल ,तोच वारसदार असल्याचा योग्य संकेत तुला भेटेल, त्यावेळेस ती चर्मपत्रे या संदुकी सकट त्याला देऊन टाकावेत. आणि परवा बेथल हेमहून तू परत आलास, तेव्हा जो तेजस्वी तारा तुझ्या सोबत येत होता, त्या ताऱ्या ने मला संकेत दिला की तूच तो योग्य व्यक्ती आहेस आणि म्हणून तुला ही चर्मपत्रे, ही संदूक मी भेट देत आहे, पण तुला काही अटींचे पालन करावे लागेल. पहिली अट ही आहे की या सं दुकी मध्ये शंभर मोहरा असणारा एक बटवा आहे त्याच्याने तू भरजरी वस्त्र किंवा अन्य वस्तू विकत घेऊ शकतोस आणि आपला व्यापार सुरू करू शकतोस .दुसरी अट ही आहे की धनसंपत्ती कमावल्यानंतर त्या संपत्तीचा अर्धा भाग तू नेहमी गरजवंतांमध्ये वाटून टाकशील .ही अट कधीच तुला मोडता येणार नाही .हे तुला मान्य आहे का? हाफिद या अटी मान्य करतो. तिसरी अट आहे की या चर्मपत्रांवर लिहिलेल्या सूत्रांना गुप्त ठेवायचे .ही सूत्रे कुणालाही सांगायची नाहीत. ज्या दिवशी योग्य वारसदार भेटल्याचा संकेत मिळेल त्या दिवशी त्या व्यक्तीला ही चर्मपत्रे आणि संदूक देऊन टाकायची. तसे वचन पात्रोसला देऊन हाफिद तिथून निघून जातो. दमास्कस ला जाऊन आपल्या खोलीमध्ये सकाळच्या वेळी ती चर्मपत्रांची पेटी उघडल्यानंतर आपल्या मालकाची शिकवण त्याला आठवते, तुमचा जिंकण्याचा निर्धार पक्का असला तर तुम्ही कधीच अपयशाच्या पकडीत येणार नाही. तो पहिले चर्मपत्र वाचण्यास सुरुवात करतो. ते वाचत असताना तो विचार करतो की मी अजरामर नाही, पण मी धीर धरण्याची कला जो पा सेन. ऑलिव्ह वृक्ष तयार व्हायला शेकडो वर्ष लागतात, तसे मी धीर धरून या जगातील सर्वात श्रेष्ठ सेल्समन बनून दाखविणार आहे. पहिल्या चर्म पत्राचे वाचन करीत असताना तो निर्धार करतो की मी स्वतःला चांगल्या सवयी लावून घेईल आणि त्यांचा गुलाम बनून जाईल .आजवरच्या आयुष्यातही मी विविध सवयींचा गुलाम होतो. आताही मला गुलामच असायला हवे तर मी चांगल्या सवयींचा गुलाम बनेल. वाईट सवयी सोडून देईन. माझ्या मनाची मशागत करेल.या चर्मपत्रांवरील एकेक सिद्धांत मी 30 दिवसांपर्यंत पुन्हा पुन्हा वाचेल ,त्याची पुनरुक्ती करेल म्हणजे या चर्मपत्रांमधील सूत्रे माझ्या अंतर्मनापर्यंत जाऊन पोहोचतील. माझ्या अंतर्मनाचा भाग बनतील आणि हळूहळू त्यांचा उपयोग करून मी प्रचंड समृद्धी आणि धनसंपत्ती मिळवू शकेल. तो स्वतःला सांगतो की आज मी एका नवीन जीवनाची सुरुवात करीत आहे आणि शपथ घेतो की कोणतीही गोष्ट माझ्या नवीन जीवनाच्या विकासाला मागे ओढू शकणार नाही. ही चर्मपत्रे वाचल्याशिवाय मी एकही दिवस घालवणार नाही ,कारण हा दिवस मला पुन्हा मिळणार नाही. आज पासून मी एक नवा माणूस बनणार आहे. नव्या जीवनासह, असा निर्धार हाफिद करतो. पहिल्या चर्म पत्राचे वाचन झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे चर्मपत्र वाचत असताना तो ठरवतो की मी प्रेमाची शक्ती आणि प्रेमाचे शस्त्र वापरून विक्रीचा माझा व्यवसाय करीन .माझ्या प्रेमाने मी सगळ्यांची मने जिंकेल आणि आजच्या दिवसाचे मी प्रेमपूर्वक ,हृदयपूर्वक अभिवादन करीन. यापुढे मी प्रत्येक गोष्टीकडे प्रेमाने पाहिल. मी सर्वांवर प्रेम करीन. मी माझ्या शत्रूंची तारीफ करीन आणि ते माझे मित्र बनतील. मी माझ्या मित्रांना प्रोत्साहन देईल आणि ते माझे बंधू बनतील .मी सतत इतरांची प्रशंसा करेल. कुणाचीही निंदा करणार नाही. आजच्या दिवसाचे मी प्रेमपूर्वक, हृदयपूर्वक अभिवादन करीन. मी महत्त्वाकांक्षी लोकांवर प्रेम करील, वृद्धांवर प्रेम करीन, तरुणांवर प्रेम करीन, सुंदरतेवर प्रेम करील, तसेच कुरुपा वरही प्रेम करीन कारण त्यांच्या आत्म्या त शांतीचा वास असतो. इतरांच्या वागण्यावर मी मुळीच प्रतिक्रिया करणार नाही. सर्वात जास्त मी माझ्या स्वतःवर प्रेम करेन. आजपासून मी माझ्या नसानसांमधील भरून असलेला तिरस्कार फेकून देत आहे .त्याच्या जागी मी प्रेमाची प्रतिष्ठापना करीत आहे.तिसऱ्या क्रमांकाच्या चर्म पत्राचे वाचन करत असताना तो ठरवतो की मी तोपर्यंत चिकाटी बाळगिन जोपर्यंत मी यशस्वी होत नाही. मी या जगात हरण्यासाठी आलो नाही. कुणीही हाकलून नेईल असे मेंढपाळाचे मी मेंढरू नाही ,मी एक सिंह आहे याची मला आता जाणीव झाली आहे. एका वेळेस एक पाऊल उचलून मी माझा प्रवास चालू ठेवीन.अपयशाला घाबरणार नाही. मी कधीच हारण्याचा विचार करणार नाही.मी प्रयत्न करीन, पुन्हा पुन्हा प्रयत्न करीन,पुन्हा प्रयत्न करीन. प्रत्येक अडथळा ओलांडून मी पुढे जाईल. मी तोपर्यंत चिकाटी बाळगिन जोपर्यंत मी यशस्वी होत नाही. आजचा दिवस हा माझ्या जीवनातील सर्वोत्तम दिवस आहे याची मी जाणीव ठेवीन .चौथ्या क्रमांकाचे चर्मपत्र वाचत असताना हाफिद आणखी काही निर्धार आपल्या मनाशी करतो .त्याला जाणीव होते की आपण निसर्गाची अद्वितीय रचना आहोत. आपल्यासारखा दुसरा कोणीही या पृथ्वीतलावर नाही .तो स्वतःला सांगतो की मी निसर्गाचा सगळ्यात महान चमत्कार आहे. त्याला जाणीव होते की आजवर माझ्याआधी होऊन गेलेल्या सर्व सम्राटांपेक्षा व सर्व पंडितांपेक्षा मी शरीराने व मनाने अधिक सुसज्ज आहे. म्हणून मी माझ्या कौशल्याचा, ज्ञानाचा,मनाचा ,शरीराचा चांगला उपयोग करीन आणि आपल्या सिद्धी शेकडोपटींनी किंवा त्याहून अधिक पटींनी वाढवेल आणि आजपासूनच त्याची मी सुरुवात करेन .माझ्या या सर्व सुप्त क्षमतांचा वापर करून मी यश मिळवेन. सतत विक्री वाढवत जाईन.माझ्या पारिवारिक समस्या मी घरीच सोडून येईल. बाजारात असताना मी कधीच माझ्या परिवाराचा विचार करणार नाही .बाजारातील समस्या बाजारातच ठेवून मी घरी जाईल. आणि घरी असताना माझ्या धंद्याचा विचारही करणार नाही. आयुष्यातील सर्व दुःख, समस्या, निराशा या बुरख्याआड दडलेल्या संधी आहेत याची मी जाणीव ठेवेन. तो निर्धार करतो की मी विजयी होईल, मी एक महान सेल्समन बनेल, कारण मी अद्वितीय आहे आणि मी निसर्गाचा सगळ्यात महान चमत्कार आहे. यानंतर पाचव्या चर्म पत्राचे वाचन करीत असताना तो ठरवतो की हा दिवस मी अशा रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या अमूल्य दिवशी मी कालच्या जखमांचा विचार करणार नाही. कालचा दिवस नष्ट झाला आहे म्हणून मी त्याचा अजिबात विचार करणार नाही, तसेच उद्याच्या समस्यांचा मी विचार करणार नाही. हा दिवस मी अशा रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. अनेक लोक कालच्या दिवसात मरून गेले असताना मला हा दिवस का मिळाला असेल? कारण यात निसर्गाचा काहीतरी हेतू असेल.त्याला जाणीव होते की मी एक दिवस वाया घालवतो तेव्हा मी दुसराही दिवस नष्ट करत असतो .आजचा दिवस व्यर्थ घालवला तर मी माझ्या जीवनाच्या पुस्तकाचे शेवटचे पान नष्ट केल्यासारखे होईल, म्हणून आजचा दिवस मी खूप चांगल्या पद्धतीने जगेल, कामे व कर्तव्य मी आजच पूर्ण करील. माझ्या लहान मुलांना आजच कुशीत घेईल कारण ती उद्या माझ्याजवळ नसतील. माझ्या पत्नीवर प्रेम करेल कारण तीही कदाचित उद्या माझ्या आयुष्यामध्ये नसेल. आज माझा शेवटचा दिवस असल्यामुळे मी अधिक परिश्रम करील, अधिक विक्री करीन आणि हा माझा शेवटचा दिवस ठरला नाही तर त्याबद्दल परमेश्वराचे नतमस्तक होऊन आभार मानीन. सहाव्या चर्मपत्रांमध्ये असलेल्या सूत्रांचे वाचन करत असताना तो ठरवतो की आज मी माझ्या भावनांना नियंत्रित करीन .मनामध्ये असंख्य विचार येतात, असंख्य भावनांची आंदोलने होत असतात. काल मी आनंदित असतो,तर आज दुःखी होतो. पण आजचे दुःख उद्याच्या सुखाची बीजे घेऊन आलेले असते, याची जाणीव ठेवली पाहिजे .मी प्रसन्न राहिलो तरच माझे ग्राहक प्रसन्न राहतील. म्हणून मी माझ्या भावनांना नियंत्रित करीन. +मला उदास वाटू लागले तर मी गाणे गाईन .मला दुःख वाटू लागले तर मी हसेल .आजारी पडल्यासारखे वाटले तर दुप्पट काम करीन .मला भीती जाणवू लागली तर मी जोरात पुढे मुसंडी मारून जाईन. मला हीनपणा वाटू लागला तर मी नवे वस्त्र धारण करीन. मला अनिश्चितता जाणवू लागली तर मी माझा आवाज उंचावेल. दारिद्र्य जाणवत असेल तर येणाऱ्या संपत्तीचा विचार करीन. अकार्यक्षमता जाणवू लागली तर मी भूतकाळातील यशांची आठवण ताजी करीन. शूद्रता जाणवू लागली तर मी माझ्या ध्येयांना आठवीन. एकाच भेटीत माणसाचे मूल्यमापन करणार नाही.जे तिरस्कार करतात त्यांनाही उद्या भेटायला जाईल.आज मी निर्धार करतो की मी माझ्या नियतीचा ताबा मिळविला आहे आणि माझी नियती मी या जगातील सर्वात महान सेल्समन बनणार आहे हीच आहे. मी महान बनेल, मी माझा स्वतःचा मालक बनेल.सातवे चर्मपत्र वाचताना तो मनाशीच निर्धार करतो की मी जगावर हसेल .हसण्याची शक्ती निसर्गाने फक्त मानवालाच दिली आहे जिचा वापर करून मानव आपले जीवन सुधारू शकतो. हसल्याने माझी पचनक्रिया सुधारेल .माझ्या मनावरचे ओझे हलके होईल .मी हसेन आणि माझे आयुष्य वाढेल,कारण दीर्घायुष्याचे हेच रहस्य आहे. मी सर्वात जास्त स्वतःवर हसेल. स्वतःला जेव्हा माणूस जास्त गंभीर पणे घेतो तेव्हा तो अत्याधिक हास्यास्पद बनतो. कुठल्याही परिस्थितीत मी लक्षात ठेवेल की हे पण निघून जाईल, आणि मी जगावर हसेन .अतिशय दारिद्र्यांमध्येही मी लक्षात ठेवेन की हे पण निघून जाईल. मी आजच्या दिवसाला हास्यरंगाने रंगवून टाकील. आजची रात्र मी गीतांनी सजवेन. आनंदी राहण्यासाठी काहीच कष्ट करावे लागत नाहीत. दुःखी होण्यासाठी मला वेळच असणार नाही. यशा मध्ये असेल, अपयशा मध्ये असेल, मी आनंदी बनेल, मी यशस्वी बनेल, मी एक महान सेल्समन बनेल. आठव्या चर्मा पत्राचे वाचन करीत असताना हाफिद निर्धार करतो की आज मी माझे मूल्य शेकडोपटींनी वाढवीन .प्रतिभावंत माणसाच्या स्पर्शाने वस्तूचे मूल्य वाढते ,तसेच मी आजपासून माझे मूल्य शेकडोपटींनी वाढवीन .मी माझ्या मातीतून किल्ला उभा करीन. माझी उद्दिष्टे प्राप्त झाल्यावर त्यांची उंची मी अधिक वाढवेल, त्यांना उंचावेल. सतत या तासापेक्षा पुढचा तास अधिक उत्कृष्ट करण्यासाठी धडपड करीन. असे मी पुन्हा पुन्हा करील, पुन्हा पुन्हा करीत राहील, आणि जग माझी महानता बघून थक्क होईल. नव्या चर्म पत्राचे वाचन करीत असताना तो ठरवतो की मी आत्ताच कामाला लागेल, मी लगेच कृती करायला सुरुवात करेल .आळस ,काम पुढे ढकलण्याची प्रवृत्ती सोडून देईन. मी आत्ताच कामाला लागेल. काजव्यांचा धडा लक्षात ठेवीन. ते जेव्हा उडत असतात, तेव्हाच प्रकाश देऊ शकतात. म्हणून मी एक काजवा बनेल आणि उडत राहील, काम करत राहील, प्रयत्न करत राहील.मी आत्ताच काम करील, मी आत्ताच काम करील, मी आत्ताच काम करील हे वारंवार माझ्या मनाला सांगत राहील. प्रलोभनांपासून दूर राहील .माझे जवळ फक्त आजचा दिवस आहे याची जाणीव ठेवेल. मी उशीर केला तर यश रुपी सुंदरी दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालील याचीही मी जाणीव ठेवेल. संकटकाळी आपण देवाची प्रार्थना करतो .मी केवळ मार्गदर्शनासाठीच देवाची प्रार्थना करेल .भौतिक वस्तूंसाठी कधीही प्रार्थना करणार नाही. हे परमेश्वरा, तू माझ्या बोटाला धरून मला चालव अशी मी प्रार्थना करेन .दुर्बलांबद्दल मी मनात प्रेम ठेवीन. हे ईश्वरा, या विनम्र विक्रेत्याला मदत कर, हे ईश्वरा मार्ग दाखव,अशी तो प्रार्थना करतो .अखेरच्या प्रकरणात वृद्ध झालेला हाफिद त्या व्यक्तीची वाट पाहत असतो जिला ती चर्मपत्रे त्याला द्यायची असतात ,पात्रोसने त्याला दिलेला वसा त्याला त्या व्यक्तीला सोपवायचा असतो .तो वाट पाहत राहतो .अशीच तीन वर्षे जातात आणि एक माणूस त्याला भेटायला येतो, ज्याचे कपडे फाटलेले असतात, कपड्यांच्या चिंध्या झालेल्या असतात, केसांच्या जटा झालेल्या असतात .तो व्यक्ती हाफिदला येऊन भेटतो आणि आपली गोष्ट सांगायला लागतो. तो सांगतो की माझे नाव सोल आहे ,जे रुसलेम मधून मी आलेलो असून मी जेरुसलेम मधील माझ्या जन्मस्थानी परतत आहे. माझ्या या अवतारावर जाऊ नका. मी जु जमातीचा आहे, आणि स्टीफन नावाच्या एका व्यक्तीच्या देह दंडाच्या शिक्षेमध्ये मी सामील झालो होतो. स्टीफन येशू नावाच्या एका माणसाचा अनुयायी होता. स्टीफनच्या मृत्यूपूर्वी एक वर्ष आधीच येशूला रोमन लोकांनी सुळावर लटकवले होते. येशू हाच मसीहा आहे असे स्टीफन म्हणत होता. त्यामुळे त्याला देह दंड देण्यात आला होता. मला मंदिराच्या उच्च पुजाऱ्यांनी येशूंच्या अन्य साथीदारांना जेरबंद करून आणण्याच्या मोहिमेवर पाठविले होते. पण त्या भावनेसहित दमा स्कस मध्ये प्रवेश करता च मला जोराचा विजेचा धक्का बसला आणि मी आंधळा झालो. मला आवाज आला की सॉल, तू मला का छळतोस? तो आवाज येशूचा होता आणि येशूने मला सांगितले की तू शहरात जा. मग तू काय करावेस हे तुला सांगितले जाईल. मी दमास्कस मध्ये गेलो. येशूच्या एका अनुयायाच्या घरी राहिलो. हळूहळू मला दिसायला लागले. अंगातली शक्ती परत आली . मला जू लोकांच्या मंदिरामध्ये, सिनेगॉग मध्ये आणण्यात आले ,आणि मी, जो येशू विरोधी कामगिरीवर आलो होतो तो येशूचे गुणगान करायला लागलो आणि लोकांना सांगायला लागलो की येशू हाच तो मसीहा आहे जो जगाच्या उद्धारासाठी आला होता. पण येशूच्या अनुयायांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. त्या सर्वांनी मला शत्रूच मानले आणि एके दिवशी मी मंदिरात गेलो असता मला पुन्हा येशूचा आवाज ऐकू आला. त्यांनी मला सांगितले की चार वर्षांपासून थोड्या का होईना लोकांना प्रकाश दाखविला आहेस. पण अगदी ईश्वराचा संदेश असला तरी तो लोकांना तू विकला पाहिजेस.आणि त्यासाठी तू दमास्कस ला जा आणि जगातील सर्वात मोठा सेल्समन समजला जातो त्या व्यक्तीचा शोध घे जो तुला खरा मार्ग दाखवेल .हे ऐकून हाफिदला जाणवले की कदाचित हाच तो व्यक्ती असू शकतो ज्याला तो चर्मपत्रांचा वसा त्याला द्यायचा होता. येशूची सर्व कथा आणि त्याचा मृत्यू, आणि त्याचे पुनरुत्थान हे सगळे त्यांनी सांगितले आणि आपल्या पिशवीतून त्याने एक वस्त्र काढले जे येशूला क्रुसावर चढवले त्यावेळेस त्याच्या अंगावर होते. ते रक्ताने माखलेले वस्त्र पाहून हाफिदचे हात थरथर कापू लागले.त्यांनी ते वस्त्र उलगडून पाहिले .त्याच्यावर तेच चांदणीचे चिन्ह आणि तोलाचे चिन्ह होते .हे तेच वस्त्र होते की जे त्याला पात्रोसने दिले होते. हाफिद ने त्याला विचारले की मला येशूच्या जन्माची कथा सांग .त्या माणसाने सांगितले की येशूचा जन्म बेतल हेम च्या एका गुफेत झाला होता. हाफिदच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने विचारले, त्या बालकाच्या जन्माच्या वेळेस आकाशात एक तेजस्वी तारा चमकत होता का? दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेवटी वृद्ध हाफिद उठतो आणि आपल्या विश्वासू सेवकाला तो इशारा करतो की मित्रा, ती संदुक घेऊन ये, शेवटी आपल्याला आपला सेल्समन सापडला.

Comments
Post a Comment